भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गौण खनिज प्रकरणातील संशयास्पद भूमिकेबाबत भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात आले असून या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी अवैध गौणखनिज प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. यात प्रामुख्याने मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड शिवारातील खडसे कुटुंबाची मालकी असलेल्या भुखंडावरील उत्खननाची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी एसआयटी देखील निर्मित करण्यात आली आहे.
यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील महालक्ष्मी स्टोन क्रेशरच्या अवैध उत्खननाची देखील तक्रार केली होती. यात या स्टोन क्रेशर चालकाने २०१७ ते २०१९च्या दरम्यान अवैध उत्खनन केले. या प्रकरणी आपण केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र प्रांताधिकार्यांकडे अपील दाखल करण्यात आल्यानंतर या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात आली. यामुळे या प्रकरणी महसूल यंत्रणा ही स्टोन माफियांना पाठबळ देण्यात येत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी देखील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या गैरकारभाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा केली.
या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा प्रकार अतिशय गंभीर असा आहे. यामुळे भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन करण्यात येत आहे. त्यांची जळगावच्या जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, त्यांचा अपसंपदेची देखील चौकशी करण्यात येईल असे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महसूलमंत्र्यांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या निलंबनाची घोषणा केली असली तरी याबाबतचे आदेश प्रशासकीय पातळीवरून नेमके केव्हा काढण्यात येणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.