कोरोना रूग्णांची प्रशासनासोबत हुज्जत; घरीच उपचारासाठी हेका

बोदवड प्रतिनिधी | तालुक्यातील भानखेडा गावात कोरोना पेशंटची संख्या वाढत असतांना रूग्णांनी हॉस्पीटलऐवजी घरीच उपचाराचा आग्रह धरून प्रशासनासोबत हुज्जत घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे भानखेड्यात आजपासून पोलीस बंदोबस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून बोदवड तालुक्यात काही रूग्ण आढळून आले आहेत. यात भानखेडा गावात अलीकडच्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण आढळले. ९ ऑगस्टला भानखेडा गावात नवीन रुग्ण आढळला होता. यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी गावातील १४७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ८ जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर ३९२ जणांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या भानखेडा गावात एकूण ११ रुग्ण आहेत. या रूग्णांचा इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य, महसूल आणि पोलीस पथकाने कंटेनमेंट झोन तयार करून फवारणी केली.

यानंतर सोमवारी तहसीलदार प्रथमेश घोलप, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज चौधरी, बीडीओ संतोष नागटिळक यांच्यासह प्रशासनाच्या पथकाने रूग्णांनी दवाखान्यात भरती होऊन उपचार घ्यावेत, जेणेकरून इतरांना संसर्ग होणार नाही अशा सूचना केल्या. मात्र, रूग्णांनी गृह विलगीकरणातच उपचार करण्याचा आग्रह धरला. यातून प्रशासनाच्या पथकासोबत हुज्जत घालण्यात आली. यामुळे भानखेड्यात आजपासून पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून वेळ पडल्यास कर्फ्यूसारख्या कठोर उपाययोजना करण्याचे संकेत तहसीलदार प्रथमेश घोलप यांनी दिले आहेत.

Protected Content