भुसावळच्या आरएमएस कॉलनीवासियांचे पाण्यासाठी उपोषण

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिवपूर-कन्हाळा रोडवरील आरएमएस कॉलनीच्या रहिवाशांनी आज पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

याबाबत आरएमएस कॉलनी येथील रहिवाशांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आपली आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, आरएमएस कॉलनी आणि परिसरातील अन्य कॉलन्यांमध्ये हजारो नागरिक राहतात. मात्र या परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केलेला नसून अन्य नागरी सुविधांचे नियोजनही करण्यात आलेले नाही. सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असल्याने या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात पिण्याच्य पाण्याची तरतूद करावी यासाठी सुमारे २० वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत असला तरी यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे या भागातील नागरिक हे भुसावळ नगरपालिकेचे मतदार असूनही आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. मात्र नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासह अन्य नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी या निवेदनात व्यक्त केला आहे. दरम्यान, या उपोषणाच्या माध्यमातून शहरातील पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आल्याचे मानले जात आहे.

Add Comment

Protected Content