भुसावळात पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’

भुसावळ प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर पोलीस प्रशासनाने ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबवून दोन गुन्हेगारांना गजाआड केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भुसावळ शहरात मंगळवारी रात्री १० ते बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यत ऑपरेशन ऑल आऊट पार पाडले. यामध्ये डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे एपीआय मंगेश गोटला, एपीआय संदीप दूनगहू, एपीआय गणेश धुमाळ, एपीआय विनोदकुमार गोसावी, गुन्हे शोध पथकाचा समावेश होता.

या ऑपरेशनमध्ये १८ हद्दपार आरोपींच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. यात पोलिसांना हद्दपार असलेला हेमंत पैठणकर हा महाराणा प्रताप शाळेच्या बाजूला त्याच्या राहत्या घरी सापडला. त्याच्या घरातून एक तलवार देखील जप्त करण्यात आली. यासोबत मुस्लिम कॉलनी भागातील गरीब नवाज मशिदीसमोरील रहिवासी शाहीद शेख पिंजारी याच्या घरी पोलिसांनी तपासणी केली. त्यात पलंगाखाली लपवून ठेवलेल्या दोन तलवारी पथकाला सापडल्या.

या मोहिमेत वॉन्टेंड २१ संशयितांच्या घरी तपासणी करण्यात आली. यात पाटील मळ्यातील राहूल नेहेते याला पोस्कोच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. तर शहर पोलिसांनी देखील संशयीतास कलम-३०७च्या गुन्ह्यात अटक केली. पोलिसांनी रात्री अवैध दारूविक्री प्रकरणी चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले. तर, रात्री नाकाबंदी केली असता एक विनाक्रमांकाचे व कागदपत्रे नसलेले वाहन होते. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेत गुन्हा नोंदवला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!