भुसावळ प्रतिनिधी । रेल्वेने केलेल्या कारवाईमुळे बेघर झालेल्या पाच हजार नागरिकांचे पुनर्वसन न केल्यास ७ डिसेंबर रोजी लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचा इशारा रिपाइंने ( आठवले गट ) दिला आहे.
शहरातील रेल्वे उत्तर वार्ड, १५ बंगला आदी भागात रेल्वेने दोन वर्षांपूर्वी अतिक्रमण काढले, मात्र पाच हजार नागरिकांचे पुनर्वसन केले नाही, या अतिक्रमणधारकांना तत्काळ घरे मिळावी या मागणीसाठी आरपीआयने शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन केले.
जिल्ह्यात अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अतिक्रमधारकांचे पूनर्वसन केले जाते, मात्र भुसावळ शहरात या प्रकरणी दुर्लक्ष का केले जात आहे? असा प्रश्न आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केला. या मागणीबाबत प्रशासनाने विचार न केल्यास आगामी काळात रिपाईतर्फे ७ डिसेंबर रोजी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्राऊंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढला जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, कोषाध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, गिरीश तायडे, प्रकाश सोनवणे, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे आदी उपस्थित होते.