कोविड योध्द्यांना तात्पुरता दिलासा; भाजपच्या वैद्यकीय आघाडीचा पाठपुरावा

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमध्ये अतिशय मोलाची भूमिका निभावणार्‍या कंत्राटी कामगारांबाबत भाजपच्या वैद्यकीय आघाडीने आवाज उठविल्यानंतर आता या कर्मचार्‍यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने परिचारक, सहाय्यक आदींसह अन्य कर्मचार्‍यांची कंत्राटी भरती केली होती. जिल्ह्यात या प्रकारात सुमारे चार हजार जणांना रोजगार मिळाला आहे. कोरोनाच्या आपत्तीत या मंडळीने अतिशय प्रमाणिकपणे काम केले आहे. आता मात्र या सर्व कर्मचार्‍यांचा कंत्राट हा २० नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार असल्याने त्यांच्या समोर संभ्रमाचे वातावरण पसरले होते.

या पार्श्‍वभूमिवर, भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी या कंत्राटी कर्मचार्‍यांचा कंत्राटाचा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी केली होती. याचेच फलीत म्हणून आता या कर्मचार्‍यांचे कंत्राट या महिन्याच्या अखेरीसपर्यंत वाढविण्यात आले आहे. हा कालावधी अजून वाढवून मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. नि. तु. पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना केले आहे.

Protected Content