भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात काल रात्री एकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकी क्रमांक सातच्या परिसरातील मशिदीच्या समोर आज सकाळी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आला. आज सकाळी याबाबतची माहिती उघडकीस आल्याने खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिली. यानंतर पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील अरूण इंगळे (रा. समतानगर रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ) असल्याचे निष्पन्न झाले. तर या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर हा खून रात्री बाराच्या सुमारास झाला असून मयताच्या अंगावर धारदार हत्याराचे वार करण्यात आले असून त्याला दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी याच रोडवर पुढे एकाची हत्या झाली होती. यानंतर पुन्हा एकदा खून आणि तो देखील पोलीस चौकीच्या जवळच झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, खुनाची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे आणि त्यांच्चे सहकारी कर्मचारी देखील होते.