जळगाव प्रतिनिधी । चिकी विकून शिक्षण करणार्या शुभम सोनार याबाबतची माहिती डॉ. नि. तु. पाटील यांनी सोशल मीडियात टाकल्यानंतर त्याला समाजातून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात समोर आले आहेत. आता जळगावच्या पाठोपाठ त्याने भुसावळातही चिकी विक्री सुरू केली असून त्याला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत वृत्त असे की, ख्यातनाम नेत्ररोग तज्ज्ञ तथा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील हे जळगावला आले असतांना त्यांना शुभम सोनार हा मुलगा चिकी विक्री करतांना दिसून आला होता. त्यांनी त्याच्याकडून चिकी घेऊन विचारपूस केली. यावेळी त्याने आपण हा व्यवसाय करून घरच्यांना हातभार लावतांनाच शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्याचे वडील व्याधीग्रस्त असल्याने अंथरूळाला खिळून असून आई किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह भागविते. आता आईला शुभम मदत करून संसाराचा गाडा ओढत असून याच्या जोडीला शिक्षण देखील करत आहे.
डॉ. नि. तु. पाटील यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट टाकली. लाईव्ह ट्रेंडस् न्यूजनेही याबाबत वृत्त प्रकाशित केले. आपण हे वृत्त या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. दरम्यान, या वृत्तानंतर शुभम सोनार याला समाजातून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे आले. त्याच्या चिकी विक्रीला चांगला प्रतिसाद लाभला. आधीपेक्षा जास्त प्रमाणात त्याची चिकी विक्री होऊ लागली आहे.
दरम्यान, शुभम याने भुसावळ येथेही चिकी विक्री करावी अशी मागणी काही जणांनी केली. या अनुषंगाने त्याने नुकतेच भुसावळात येऊन विक्री केली असता, त्याला चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे आता त्याने नियमितपणे भुसावळ येथेही चिकी विक्री करण्याचे ठरविले आहे. आपण या संदर्भात शुभम सोनार याच्याशी 93223 06065 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
डॉ. नि. तु. पाटील,भुसावळकर
8055595999