अचानक पिस्तुलातून सुटली गोळी…आणि बहाद्दरांनी केला लुटीचा बनाव !

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खडका येथे रात्री चुकून झालेल्या फायरिंगमध्ये अल्पवयीन मुलगा जखमी झाला. तर उर्वरित चौघांनी लुटमारीतून हा प्रकार घडल्याचा केलेला बनाव पोलिसांनी उधळून लावत त्या सर्वांना गजाआड केले आहे.

याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणालेत की, तालुक्यातील खडका येथे काही तरूण बसले असतांना अचानक त्यांच्या ताब्यात असणार्‍या पिस्तुलमधील गोळीस सुटल्याने त्यांच्यातील अल्पवयीन मुलाच्या मांडीला जखम झाली. त्या मुलास तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तालुका पोलिसांनी तपास सुरू केला.

पहिल्यांदा या मुलासोबत असणार्‍या तरूणांनी आम्हाला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर आम्ही प्रतिकार केला. तेव्हा चोरट्यांनी गोळीबार केल्याने तो मुलगा जखमी झाल्याचे सांगितले. मात्र तालुका पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास केला असता हा भलताच प्रकार असल्याचे समोर आले.

पोलिसांनी केलेल्या तपासात अल्पवयीन मुलासह चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व मनोज कोळी हे सर्व जण खडका येथे बसले होते. याप्रसंगी त्यांच्याकडे असणार्‍या अवैध पिस्तुलातून अचानक गोळी सुटली. ही गोळी अल्पवयीन मुलाच्या मांडीत गेल्यामुळे तो जखमी झाला. यामुळे आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार म्हणून इतरांनी लुटीचा बनाव पोलिसांना सांगितला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासातून सगळे काही समोर आले आहे. यामुळे तालुका पोलीस स्थानकात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलासह चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व मनोज कोळी यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

दरम्यान, भुसावळात आढळून येणारे पिस्तुले हा अतिशय चिंतेचा विषय असून यातूनच ही घटना घडल्याचे दिसून येत आहे.

Protected Content