बाजार समितीत शेतकर्‍यांचे आंदोलन


जळगाव प्रतिनिधी । जनता कर्फ्यू असूनही शेतकर्‍यांना भाजी बाजारातील लिलाव बंद राहतील याची माहिती न देण्यात आल्यामुळे शेतकरी आज आपला माल घेऊन आले. तथापि, व्यापारी खरेदीसाठी न आल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.

जळगाव शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. शहराच्या हद्दीत किरकोळ भाजीपाला विक्रीस बंदी आहे. यातच शेतकरी हे आपला माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळीच दाखल झाले. मात्र, शहरात जनता कर्फ्यू असल्याने शेतकर्‍याचा माल खरेदीसाठी व्यापारीच आले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला व त्यांनी बाजार समितीचे  मुख्य द्वार बंद करून तेथे ठिय्या आंदोलन केले.
शेतकर्‍यांनी कृषी बाजार समिती आज बंद राहणार असल्याचे शेतकर्‍यांना का कळविण्यात आले नाही ? असा प्रश्‍न उपस्थित केला. आमचे नुकसान झाले आहे यास कोण जबाबदार आहे ? आमचे नुकसान कोण भरून देणार असा संतप्त सवाल शेतकरी करत होते. तसेच उद्या शेतीमाल खरेदी केला जाणार आहे किंवा नाही हे आताच समजले पाहिजे असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. ज्याप्रमाणे किरकोळ व्यापार बंद ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे बाजार समिती देखील बंद ठेवायला हवी होती. बाजार समिती बंद असती तर शेतकर्‍यांनी माल विक्रीसाठी आणलाच नसता असा दावा शेतकर्‍यांकडून करण्यात आला.दरम्यान, बाजार समिती बंद ठेवण्याबाबत आम्हाला नियोजन वा लेखी आदेश आलेले नसल्याने आम्ही बाजार समिती बंद ठेवू शकत नसल्याचे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पदाधिकार्‍यांनी व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती, कामगार मजदूर संघटना यांची बैठक घेऊन माल खरेदीबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊ असे सांगितले शेतकर्‍यांना समजविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत नियोजित बैठकीत झालेला निर्णय शेतकर्‍यांना कळविण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले. यावर शेतकर्‍यांचे समाधन झाल्याने त्यांनी मुख्य प्रवेशद्वार वाहतुकीसाठी पुन्हा खुले केले.

Protected Content