भुसावळ प्रतिनिधी | खोटे दस्तऐवज सादर करून शेतजमीन भरपाईची रक्कम आपल्या बँक खात्यात परस्पर वळती करण्याच्या प्रकरणी पाच जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहर पोलीस स्थानकात राजेश गंगाधर जोशी (रा.मॉडर्न रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार मंगेश दीपचंद लढ्ढा (रा.बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (रा.गंगाराम प्लॉट,भुसावळ), ब्रजेश राधेश्याम लाहोटी (रा. गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मीता राजेश काकाणे (रा.वरणगाव) या पाचही संशयितांनी रजिस्टर खरेदी खतात लिहून देणार हा शब्द करून लिहून घेणार असा असा बनलून घेत योगेश गंगाधर जोशी यांच्या नावाची स्वाक्षरी नसलेला २ जुलै २०१३ या रोजीचा खोटा व बनावट स्टॅम्प बनवून सक्षम प्राधिकारी भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे खोटे व बनावट दस्तावेज सादर केले. याचाच वापर करून २५ सप्टेंबर २०१३ ते १४ ऑक्टोबर २०१५ दरम्यान संपादित जमिनीची १३ लाख ७४ हजार ३१६ रुपयांची रक्कम बँक खात्यात वर्ग करून फिर्यादी व शासनाची फसवणूक केली असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या फिर्यादीनुसार मंगेश दीपचंद लढ्ढा (रा.बद्री प्लॉट, भुसावळ), प्रेमराज विठ्ठलदास बढे, महेंद्र शांतीलाल सुराणा (रा.गंगाराम प्लॉट,भुसावळ), ब्रजेश राधेश्याम लाहोटी (रा. गायत्री शक्तीपीठाजवळ, भुसावळ), स्मीता राजेश काकाणे (रा.वरणगाव ) यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले सर्व व्यक्ती हे शहरातील प्रतिष्ठीत असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनोदकुमार गोसावी करत आहेत.