भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अल्पवयीन मोलकरणीला अमानुष मारहाण करणार्या दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात वास्तव्यास असणारे नरेश आठवाणी यांनी घरकामासाठी नाशिक येथून एका अल्पवयीन मुलीस आणले होते. गेल्या दोन वर्षापासून ही मुलगी त्यांच्या घरचे काम करत होती. तिने अलीकडेच आपल्या आई-वडलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आठवाणी यांच्यासह त्यांची पत्नी राधा यांनी याला नकार दिला. एवढेच नव्हे तर राधा आठवाणी यांनी त्या मुलीला अमानुष मारहाण केली.
यामुळे त्या मुलीने घरातून पळ काढला. पोलिसांनी या मुलीची विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नरेश आठवाणी आणि राधा आठवाणी (रा. सिंधी कॉलनी) यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरिक्षक हरीश भोये हे करत आहेत.