भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नाहाटा कॉलेज चौफुलीवरील उड्डाण पुलाचे छत्रपती शिवाजी महाराज असे नामकरण रातोरात केल्यानंतर पोलिसांनी हा फलक काढला असून या प्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नाहाटा चौफुलीवरील उड्डाण पुल अद्याप सुरू झाला नसला तरी याच्या नामकरणासाठी गत काही दिवसांपासून निवेदने दिली जात आहेत. या अनुषंगाने कालच सकल मराठा समाजातर्फे या उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे असे निवेदन देण्यात आले होते. यानंतर आज पहाटे पुलाच्या वरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल असा फलक लावल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, आज दुपारी पोलीस बंदोबस्तामध्ये हा फलक काढण्यात आला. यानंतर, मराठा समाजाचे शहराध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक किरण कोलते, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, देवा वाणी, योगेश जाधव, हर्षल ब्राह्मणे, सचिन पाटील, राहुल पाटील, श्रीकांत बरकले, किशोर पाटील, एकनाथ धांडे यांच्यासह अन्य पाच ते सात अनोळखींविरुद्ध विना परवाना डिजिटल बोर्ड लावल्याप्रकरणी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम १९९५ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.