शिरपूरजवळ अपघात : भुसावळचे दोघे ठार; तीन जखमी

शिरपूर प्रतिनिधी । शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ अ‍ॅपे रिक्षाला भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत भुसावळ येथील दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. मुलीच्या भेटीसाठी जाणार्‍या भुसावळ येथील नारायण पवार यांच्या कुटुंबावर ही आपत्ती कोसळली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात घडला असून यात एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात १ वर्षीय मुलीसह ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.तर तिन जण जखमी झाले आहेत.

भुसावळ येथील नारायण पवार हे कुटुंबासह मुलीला भेटण्यासाठी भुसावळ येथून अ‍ॅपे रिक्षाने मध्यप्रदेश राज्यातील ठिकरी (ता. सेंधवा) येथे जात होते. दरम्यान, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड या गावाजवळ मध्यप्रदेश कडेच जाणार्‍या एम.एच.१८ एम. ५५१० क्रमांकाच्या आयशर गाडीने त्यांच्या अ‍ॅपे रिक्षाला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भिषण होता की यात नारायण पवार यांची एक वर्षाची नात तनिष्का नरेश पवार व त्यांची पत्नी प्रमिला नारायण पवार (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला.तर सुन शितल नरेश पवार (वय २४),नात वेदिका नरेश पवार (वय ४) व चालक जितेंद्र नाना देशमुख हे जखमी झाले आहेत.

हा अपघात हाडाखेड गावाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, यातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

Protected Content