भुसावळ प्रतिनिधी । येथील स्मशानभूमीत संरक्षक भिंत बांधण्यासह अन्य कामांना आज झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.
येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज सकाळी पार पडली. यात शहरातील विविध कामांचे विषय घेण्यात आले होते. सर्वप्रथम जनआधार आघाडीचे नगरसेवक अॅड. तुषार पाटील यांची वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा अभिनंदनाचा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला. यानंतर विविध विषयांना मान्यता देण्यात आली. नगरसेवक पिंटू कोठारी यांनी स्मशानभूमीत मानद सेवा बजावणार्या व्यक्तीला सेवेत समावून घेण्याची मागणी केली. मात्र असे करता येणार नसल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले. यावर त्याला किमान मानधन तरी देण्यात यावे अशी मागणी केली. याला गटनेते मुन्ना तेली आणि ज्येष्ठ सदस्य युवराज लोणारी यांनी समर्थन दिले. यामुळे हा विषय संमत करण्यात आला. याशिवाय, स्मशानभूमित संरक्षक भिंत बांधणे, बसण्यासाठी जागेची तरतूद आदी बाबींनाही मान्यता देण्यात आली. यानंतर विविध विषयांवर चर्चा होऊन याला पारित करण्यात आले. याप्रसंगी एकूण १४ विषयांना मान्यता देण्यात आली.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी आदींसह नगरसेवक उपस्थित होते. मात्र विरोधी गटातील तीन सदस्यांचा अपवाद वगळता अन्य नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.