भुसावळात एलएचबी कोच फॅक्टरी उभारा, अन्यथा आंदोलन- समाधान महाजन

bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ येथे रेल्वेने ४७२ कोटी रुपये खर्चून एलएचबी या आधुनिक कोचेसचा ओव्हरऑइलिंगचा म्हणजेच संपूर्ण दुरुस्तीचा कारखाना उभारण्यास मान्यता मिळाली असतांना हा कारखाना आता नागपूर येथे हलविण्यात येत आहे. यावर हा कारखाना भुसावळातच उभारावा अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात बेरोजगारीच्या प्रश्नाने कधी नव्हे इतके आता अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे आणि २०२०च्या सुरुवातीला बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीत सरकार फक्त अपयशीच ठरलेले नाही, तर नोटबंदी आणि जीएसटी सारख्या पावलांनी रोजगार नष्ट केला आहे, हे साफ दिसून आले आहे. त्यातच भुसावळात अतिक्रमण काढून २००० स्थानिकांना रोजगार देण्याचा कांगावा केला गेला. भुसावळ येथे रेल्वेने ४७२ कोटी रुपये खर्चून एलएचबी या आधुनिक कोचेसचा ओव्हरऑइलिंगचा म्हणजेच संपूर्ण दुरुस्तीचा कारखाना उभारण्यास मान्यता दिली होती. प्रदीर्घ काळानंतर भुसावळ विभागात अशी मोठी गुंतवणूक होऊन आणि परिसराचा विकास हे हेतू साध्य होणार होता.

केंद्रीय मंत्र्यांचा फक्त नागपूर विकास
आधी हा प्रकल्प नागपूरला होणार होता; परंतु एकाचा तोटा म्हणजे दुसऱ्याचा फायदा या तत्त्वाने नागपूरला प्रकल्प उभारण्यासाठी जास्त खर्च येणार होता. त्यामुळे भुसावळला हा प्रकल्प मिळाला. तत्कालीन मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी त्याला मान्यता दिली होती अशी माहिती देण्यात आली होती. नागपूर येथे हा प्रकल्प उभारला असता तर ५०७ कोटी ६४ लाख रुपये खर्च आला असता; परंतु भुसावळ येथे रेल्वेची स्वतःची मोठी जमीन उपलब्ध असल्याने ४७२ कोटींचा खर्च येणार होता. परंतु आता भुसावळात १२० कोटी रुपयांचा मेमू कारशेड दुरुस्ती कारखाना सुरु करण्यात येणार आहे. तसेच महिन्याभरात भुसावळ विभागात मेमू पॅसेंजर गाड्या धावणार आहे. या प्रकल्पामुळे फक्त २०० कुशल मनुष्यबळ लागेल. परंतु आता परत हाच प्रकल्प नागपूरला वळविण्याच्या चर्चा आहे, केंद्रातील महाराष्ट्राच्या काही मंत्र्यांनी हा फक्त “नागपूर विकासाचा” अट्टाहास केला आहे. मात्र, भुसावळ येथे होणारा महत्वाकांक्षी एलएचबी कोच फॅक्टरीचा प्रकल्प गुंडाळला गेल्याने २००० स्थानिकांना रोजगार मिळणार होता तो आता मिळणार नाही म्हणून शिवसैनिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत असे निवेदन भुसावळ शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना केले आहे.

भुसावळच्या तोंडातील विकासाचा घास हिरावून घेतला
नगरपालिकेपासून राज्यात अन्‌ केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप विकास करेल, असे भुसावळकरांना वाटत होते. पण भुसावळच्या विकास प्रकल्पांची पळवापळवी सुरू केली गेली. टेक्सटाईल पार्क नंतर प्लॅस्टिक पार्क आणि आता कोच फॅक्टरी रद्द करून भुसावळकरांच्या तोंडाला पाने पुसली. भुसावळच्या तोंडातील विकासाचा घास हिरावून घेताना रेल्वे प्रशासनाने व केंद्र सरकारने आपल्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींना “तोंड दाबून बुक्क्यांचा मार”‘ दिला आहे असे समाधान महाजन यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा करणार
आपण त्वरित एलएचबी कोच फॅक्टरीचा प्रकल्प सुरू करावा, ही स्थानिक नागरीकांची मागणी आहे. माननीय पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार संजय राऊत साहेब, माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब बुलढाणा, माननीय मंत्री गुलाबराव पाटील, माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील मुक्ताईनगर जिल्हा प्रमुख शिवसेना जळगाव यांच्याशी चर्चा करून राष्ट्रीय स्तरावर या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार आहे, असे समाधान महाजन यांनी कळविले आहे.

Protected Content