ओबीसी आरक्षणावर भुजबळांची फडणवीसांशी चर्चा

मुंबई : वृत्तसंस्था । “छगन भुजबळ ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात भेटण्यासाठी आले होते. त्यांनी इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझं मत जाणून घेतलं अशी माहिती आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली . 

यावेळी मी त्यांना मराठा आऱक्षणावेळी कसा इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा वैध ठरवला याची माहिती दिली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आमच्याकडून पूर्ण मदत केला जाईल असं आश्वासनही दिल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

 

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

 

“मला जे काही वाटतंय त्याबद्दल त्यासंदर्भात नोटदेखील करुन देण्यास तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. आमच्याकडून पूर्ण मदत होईल,” असं भुजबळांना सांगितलं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

 

कोरोनामुळे सध्याच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. पण फेब्रुवारीत महत्वाच्या निवडणुका होणार आहेत,” असं यावेळी फडणवीस म्हणाले.

 

“नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियम समितीच्या संदर्भातील बैठक पार पडणं गरजेचं आहे. अन्यथा ती बैठक वैध ठरत नाही. पण त्याहीपलीकडे जर तुमच्याकडे बहुमत असताना का घाबरत आहात? याचा अर्थ तीन पक्षात सर्व काही आलबेल नसून एकमेकांवर, आमदारांवर विश्वास नाही म्हणून हात वरुन मतदान करण्याचा विषय आला आहे,” अशी टीका त्यांनी केली.

 

“नाना पटोले एक बोलतात मग त्यावर शरद पवार मत व्यक्त करतात. मग काँग्रेसचे लोक नाना पटोलेंना न घेता शरद पवारांची भेट घेतात यावरुन काय चाललंय समजू शकतो,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल असा दावा यावेळी त्यांनी केला. ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ असंही ते म्हणाले आहेत.

 

Protected Content