कुख्यात गुन्हेगार निखील राजपूतची हत्या : भुसावळात टोळीयुध्दाचा भडका !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळसह परिसरात प्रचंड दहशत असलेला कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची मध्यरात्रीनंतर हत्या झाल्यान परिसरात टोळीयुध्दाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.

भुसावळसह परिसरात गुन्हेगारीच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात निखील राजपूतची प्रचंड दहशत पसरली होती. खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणी, धमक्या अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे त्याच्यासह त्याच्या टोळीतील सात जणांवर एकाच वेळेस मोक्का लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने पाठविला होता. तथापि, जिल्ह्यातील एका नेत्याच्या दबावामुळे या टोळीवरील मोक्का प्रत्यक्षात कार्यान्वीत झाला नाही. यामुळे निखील राजपूतची हिंमत वाढून त्याने अनेक गुन्हेगारी कृत्य केले. यात प्रामुख्याने त्याने चक्क एक पीएसआय आणि त्याच्या सहकार्‍याला धक्काबुक्की केली होती. यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची शहरातून धिंड देखील काढण्यात आली होती. तथापि, यातून काही धडा घेण्याऐवजी त्याने असे प्रकार सुरूच ठेवले.

दरम्यान, काल पहाटेच्या सुमारास त्याने फैजपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत देखील एका पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. यातून त्याच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काल रात्री तो चमेली नगरातील आपल्या राहत्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या वरील भागास आपल्या सहकार्‍यांसह झोपला होता. याप्रसंगी त्यांचा आपसात वाद झाला. यात त्याच्या काही सहकार्‍यांनी निखील राजपूतवर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मारेकर वार करून घटनास्थळावरून तात्काळ फरार झाले.

एकीकडे शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत डबल मर्डरमुळे पोलीस तिकडे धावले असतांना काही तासांमध्येच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत देखील निखील राजपूतचा खून झाल्यामुळे परिसर तर हादरला आहे. पण यातून पोलीस प्रशासनाचीही मोठी धावपळ उडाली. या प्रकरणी संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, निखील राजपूतच्या खुनामुळे भुसावळसह परिसरात टोळीयुध्दाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content