बनावट शिक्के व स्वाक्षरीसह प्लॉटची विक्री : गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी तसेच त्यांच्या पदाचे बनावट शिक्के वापरून सहकारी पतपेढीच्या विशेष वसुली अधिकार्‍याने १० प्लॉटची विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, येथील श्री जनकल्याण अर्बन क्रेडिट पतसंस्थेच्या विशेष वसुली अधिकारीपदी रवींद्र धांडे हे कार्यरत आहेत. त्याने पतसंस्थेच्या मालकीच्या फेकरी शिवारातील सर्व्हे नंबर ३/४ मधील प्लॉट १, ४, ५ व ६ बिन शेती खुले बखळ प्लॉट, जागा, स्थावर मिळकत जमिनीच्या सातबारा उतार्‍याचे विभाजन न करता, तुकडा न पाडताच विभाजन करून परस्पर विक्री केली. यासाठी रवींद्र धांडेने तहसीलदारांचा बनावट आदेश व तहसील कार्यालयातील शिक्का तयार करून त्या आदेशाच्या २२ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशाचे पत्र तयार केले. त्याआधारे १० जणांना प्लॉटची विक्री केली.

यानंतर या खरेदी-विक्रीची नोंद सहायक निबंधक खरेदी विक्री कार्यालयात १६ मे २०२२ रोजी करण्यात आली. भुसावळचे तहसीलदार धिवरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. यातून हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. या संदर्भात नायब तहसीलदार शोभा घुले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात बनावट स्वाक्षरी आणि शिक्के तयार करून प्लॉट विक्री करणारा रवींद्र गोपाळ धांडे (रा. तुळशीनगर, भुसावळ) याच्यासह प्लॉट घेणारे मनीषा कैलास कोळी (रा.फेकरी), राजेंद्र अमृत तायडे (रा.बजरंग कॉलनी, गांधीनगर, भुसावळ), उमेश विकास बर्‍हाटे (रा.जुना वरणगाव रोड, फेकरी), दीपाली अनिल सोनवणे (रा.खडका रोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ), प्रशांत बळीराम पाटील (रा. जगदंबनगर, वरणगाव), किरण भीमराव तायडे (रा.आंबेडकर नगर, वरणगाव), अक्षय प्रमोद जैस्वाल (रा.बामणोद, ता.यावल), कैलास सुधाकर पाटील (रा.निंभोरा बुद्रूक, भुसवळ), पुष्पा राजेंद्र मसराम, राजेंद्र रामचंद्र मसराम (रा.फेकरी, भुसावळ) या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट हे करत आहेत.

Protected Content