भुसावळ प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार हे १७ डिसेंबर रोजी शहरात येत असून त्यांच्या उपस्थितीत भुसावळसह परिसरातील नगरसेवक आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ५ डिसेंबर रोजी भुसावळ येथे येणार होते. या दृष्टीने नियोजनाची तयारी देखील सुरू करण्यात आली होती. तथापि, खराब हवामानामुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता. यानंतर आता ते १७ डिसेंबर रोजी भुसावळात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दौर्यात पवार यांच्या हस्ते सुशोभीकरण केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण होईल, तर उर्वरित कामांचे ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन होईल. दुपारी १ वाजता जळगाव रोडवरील सातारे चौकातील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याचे लोकार्पण तर दुपारी दीड वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा होईल. शहरातील पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांचे लोकार्पण, नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, पक्षाच्या कार्यक्रमात भुसावळासह परिसरातील नगरपालिकांमधील नगरसेवक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमात जोरदार इनकमींग करण्यात येणार असल्याचे नियोजन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे. यात भुसावळसह यावल, फैजपूर, सावदा, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड येथील इतर पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. तर, उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्याआधी नगराध्यक्ष रमण भोळे, स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी नियोजनाचा आढावा घेतला.