स्व. निखील खडसे यांच्या स्मरणार्थ भुसावळात भव्य क्रिकेट स्पर्धा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्व. निखील एकनाथराव खडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भुसावळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याचे पारितोषीक वितरण टिम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांच्या हस्ते होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा पदाधिकारी अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून शहरात स्व. निखील खडसे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वत: अनिकेत पाटील व माजी नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या स्पर्धेत ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान सामने होणार असून यात परिसरातील नामांकीत संघ सहभागी होणार आहेत. दिनांक ९ फेब्रवारी रोजी सकाळी ९ वाजता माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, प्रांत रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे आदींसह स्थानिक पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ५१ हजार, द्वितीय संघाला ३१ हजार, तर तृतीय संघाला २१ हजारांचे पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येईल. याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर, हॅॅट्ट्रीक, सलग तीन षटकार, उत्कृष्ट झेल, क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट यष्टीरक्षकाला रोख बक्षीस देण्यात येईल. पंच म्हणून जळगावातील दोन, तर भुसावळातील तिघांची नेमणूक केल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या स्पर्धेतील प्रत्येक सामना सहा षटकांचा असेल. रविवारी सकाळी १० वाजता सेमी फायनल व फायनल सामना होईल. याच दिवशी दुपारी तीन वाजता विजेत्यांना मो.अझरूद्दीन यांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याची माहिती अनिकेत पाटील आणि प्रा. सुनील नेवे यांनी दिली.

Protected Content