
भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल शिवारात घडलेल्या एका धक्कादायक घटनेला चार वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. केवळ उडिदाची दाळीची भाजी खाण्याचे म्हटल्याच्या किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दिनेश उर्फ शिवा अनाज्या बारेला याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल म्हणजे भुसावळ जिल्हा सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासूनचा पहिला जन्मठेपेचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे.

२९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाल शिवारातील शेत गट क्रमांक २७१ मध्ये झालेल्या या हत्येप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि कलम ३२३ (प्राणघातक हल्ला) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी शुक्रवारी (दि. १८ ऑक्टोबर २०२५) निकाल देताना आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडून दोषारोप सिद्ध केला. तपासात पैरवी अधिकारी पो.कॉ. कांतीलाल कोळी, ज्ञानेश्वर चौधरी आणि इमराजा झटके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
घटनेची पार्श्वभूमीही तितकीच संतापजनक आहे. फिर्यादी बनाबाई नरसिंग बारेला (वय ३२, व्यवसाय–मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आणि त्यांचे पती नरसिंग बारेला हे पुनमचंद पवार यांच्या शेतात राहत होते आणि शेतजमीन निम्म्या हिश्श्याने कसत होते. शेजारीच बनाबाई यांचे आई-वडील गीताबाई आणि अनाज्या बारेला राहत होते. बनाबाई यांचे तीन भाऊ असून त्यापैकी मोठे दोन भाऊ अंगारसिंग आणि सुनिल हे उस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. तिसरा भाऊ दिनेश उर्फ शिवा हा त्याच्या तीन मुलांसह – लक्ष्मी, कृष्णा आणि भोला – शेजारी राहत होता.
दिनेश हा कोणतेही कामधंदे करत नव्हता आणि त्याने दोन-तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी गुड्डी हिला मारहाण करून माहेरी हाकलले होते. घटनेच्या दिवशी रात्रीच्या वेळी किरकोळ कारणावरून त्याचा वडिलांशी वाद झाला. उडिदाची दाळीची भाजी खाण्याच्या मुद्द्यावरून संतापलेल्या दिनेशने रागाच्या भरात वडिलांवर हल्ला चढवला आणि त्यांच्या डोक्यात गंभीर जखम केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास आणि न्यायालयातील पुराव्यांच्या आधारे अखेर दिनेश बारेला याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयाचा हा निकाल न्यायव्यवस्थेच्या दृढतेचा दाखला ठरत असून, किरकोळ वादातून घडणाऱ्या कौटुंबिक हिंसेला आळा बसावा, असा जनसंदेश या निर्णयातून जात असल्याचे निरीक्षकांनी म्हटले आहे.



