भुसावळ प्रतिनिधी । एकीकडे कोरोनामुळे ऑक्सीजनचा तुटवडा वाढत असतांना दुसरीकडे प्रशासनाच्या बेपर्वाईने कळस गाठला आहे. या अनुषंगाने भुसावळातील ग्रामीण रूग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये काल सायंकाळी प्राणवायूची आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर डॉ. नि. तु. पाटील यांनी तातडीने स्वखर्चाने सिलेंडरची व्यवस्था केल्याने या रूग्णांना नवजीवन मिळाले आहे. मात्र अजून येथील संकट दूर झाले नसल्याने आता तरी येथे ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. मात्र बुधवारी ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सीजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा बिकट स्थिती भाजपचे डॉ. नी. तू. पाटील यांनी सात हजार रुपयांचा स्वखर्चातून १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला. यामुळे आज म्हणजे गुरुवारी सकाळपर्यंत हा साठा टिकणार आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील करोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सीजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तिव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सीजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सीजन देता येणार होता. यामुळे वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकिय आघाडीचे सहसंयोजक तथा ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान,भुसावळचे अध्यक्ष डॉ. नी. तु. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदूस्तान एजन्सीतून सात हजार रुपयांचे तुर्त दहा सिलेंडर खरेदी करुन ग्रामिण रुग्णालयात पाठवले आहे. हा ऑक्सीजनचा साठा गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत टिकू शकेल. यानंतर मात्र पून्हा सिलेंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकिय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सीजनचा पुरवठा हेात नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही निर्माण होत आहे.
वाढीव बेडचे नियोजन फोल
ट्रामा सेंटरमध्ये ऑक्सीजनयुक्त सुविधेचे ५० बेडचे नियोजन आहे. यासाठी १५ क्युबीक मिटरचा ऑक्सीजन जनरेशन प्लॉटला आमदार संजय सावकारे यांनी ३० लाखांचा निधी दिला आहे.मात्र सप्टेंबरपासूनचे हे नियोजन सात महिने उलटूनही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे मात्र ऑक्सीजन अभावी रुग्ण मरणाच्या दारात आहेत.
…तर रस्त्यावर उतरणार
बुधवारचा दिवस व रात्र ऑक्सीजन सिलेंडरमुळे लोटली गेली, मात्र गुरुवारी पून्हा पुरवठा लागणार आहे. यामुळे समाजातील दानशुरांनी मदत करुन किमान ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन रुग्णांचा जिव वाचवावा. जिल्हा व आरोग्य प्रशासन सुस्तावले असून आता रस्त्यावर उतरावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा डॉ. नि. तु. पाटील यांनी दिला आहे. तर, आपण गेल्या दोन दिवसापासून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे ऑक्सिजन कमतरता आणि ठेकेदार थकबाकी याबद्दल पाठपुरावा करत आहे. पण जिल्हा आरोग्य प्रशासन गेंड्याच्या कातडीचे आहे.आज बाह्य ऑक्सिजन १४ रुग्णांना मिळाला नसता तर विपरीत परिस्थिती आली असती,म्हणून आज स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर भरून रुग्णांच्या जीव वाचवला, आता उद्या परत हीच परिस्थिती निर्माण होईल. यामुळे परिसरातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संथा यांनी पुढे यावे असे आवाहन देखील डॉ. नि. तु. पाटील यांनी केले आहे.