भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील हतनूर येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्राला स्थलांतरीत करण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेसतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राज्य राखीव दलाचे नियोजीत प्रशिक्षण केंद्र हे नुकतेच अहमदनगर जिल्ह्यात हलविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याचा स्थानिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याला आता काँग्रेसनेही विरोध केला आहे. या अनुषंगाने काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले. यात संबंधीत केंद्र भुसावळ तालुक्यात रहावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबत एका वेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून औरंगाबाद येथील सायबर शाखेने दैनिक दिव्य मराठीचे प्रकाशक, संपादक व पत्रकार यांचेवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेऊन रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष पंकज पाटिल, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी,उपाध्यक्ष इस्माईल गवळी, तालुका सचिव ज्ञानेश्वर पाटिल, उपाध्यक्ष रवि पाटील, अनु. जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, विजय तुरकेले, दिलीप क्षीरसागर, संदिप मोरे उपस्थित होते.