भुसावळ प्रतिनिधी | सराफा दुकानातील दरोडा प्रकरणातील आरोपी मुकेश भालेराव याने पोलीस स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने तो वाचल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मुकेश प्रकाश भालेराव (वय २६, रा.बोरावल खुर्द ता.यावल, ह.मु.राहुलनगर, तापी नदी पुलाजवळ, भुसावळ) याला यावल पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. त्याला भुसावळच्या दुय्यम कारागृहात ठेवले होते. येथून शुक्रवारी सायंकाळी भुसावळ तालुका पोलिसांनी त्यांच्याकडील जबरी चोरीच्या एका गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने भालेरावला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला तालुका पोलिस ठाण्यात आणून अटकेची प्रक्रिया सुरू केली. या वेळी भालेरावने लघुशंकेला जायचा बहाणा करून तो शौचालयात गेला. तेथे खिडकीच्या तुटलेल्या काचेने त्याने स्वत:च वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. काचेचा तुकडा शौचालयाच्या भांड्यात फेकला. यामुळे आवाज कानी पडताच पोलिस कर्मचार्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला. यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर मुकेश भालेराववर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी करत आहेत.