भुसावळ प्रतिनिधी – शहरातील मिलिटरी कॅम्प परिसरातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न फसल्याची माहिती उघड झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भुसावळ आयुध निर्माणीच्या पुढे भारतीय सैन्य दलाचे ११८ टीए मिल्ट्री बटालियन स्टेशन आहे. या स्टेशनच्या आतील भागात बँक ऑफ बडोदाची शाखा अाहे. तेथे लष्करातील सैन्य कर्मचाऱ्यांची बँक खाती आहेत. बँकेला शनिवार आणि रविवारी दोन दिवस सुटी होती. याच काळात चोरट्यांनी बँकेच्या बंद असलेल्या शौचालयाला भगदाड करून स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला. स्ट्राँग रूमचे चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांना आढळले. मात्र, चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने लॉकरमधील सुमारे ९ लाखांची रोकड सुरक्षित आढळली.
याविषयी माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. बँक व्यवस्थापक भूषण दत्तू येवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.