जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेतर्फे अमृत अभियान अंतर्गत मलनिःसारण योजनेचे भूमिपूजन आज बारसे कॉलनी येथे थाटात करण्यात आले. मात्र, येथील भूमिपूजन मंडपात प्रकाश योजनेसाठी महावितरणच्या विद्युत पोलवर आकोडे टाकून झगमगाट करण्यात आल्याचा प्रकार पहावयास मिळाला.
शहरात अनधिकृत बांधकाम, अनधिकृत हॉकर्स तसेच इतर अनधिकृत गोष्टींना अटकाव करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असते. परंतु, मलनिःसारण योजनेचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महावितरणकडून कोणतीही परवानगी अनधिकृतपणे शेजारील इलेक्ट्रिक पोलवर आकडे टाकून आपला कार्यक्रम साजरा करून घेतला. या कार्यक्रमाला शहराच्या प्रथम नागरिक महापौर सीमा भोळे, शहराचे आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल तसेच महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे व काही नगरसेवक उपस्थित होते. याकार्यक्रमाला वीज चोरून वापरली जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर ते या प्रकारबद्दल नाराजी व्यक्त करत होते.