जळगावात भवानी मातेच्या जयघोषात ओढल्या ‘बारागाड्या’; भाविकांची प्रचंड गर्दी (व्हिडीओ)

baragadya

जळगाव प्रतिनिधी । अक्षय्यतृत‌ीयेनिमित्त शहरातील पिंप्राळा आणि मेहरूण भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही बारागाड्या ओढण्यात आल्या. भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त शहरातील पिंप्राळा आणि मेहरूण भागात पारंपारिक पध्दतीने अखंडपणे बारागाड्या ओढण्याचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

मंगळवार ७ मे रोजी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास भगत हिलाल बोरसे यांच्यासह भक्तांनी ध्वजासोबत भवानी मातेच्या मंदिराला अकरा प्रदक्षिणा घातल्या. बारागाड्यांची पूजन आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अमर जैन, कुलभूषण पाटील, विजय पाटील, नगरसेवक पुत्र अतुल बारी आदी उपस्थतीत होते.

पुजन केल्यानंतर भगतासह भाविकांनी बारागाड्यांना पाच प्रदक्षिणा मारल्यानंतर बारागाड्या महामार्गाच्या पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालयापर्यंत ओढण्यात आल्या. भगत हिलाल बोरसे यांच्यासह बगले आनंदा बोरसे, दामू बोरसे, गोविंदा बोरसे, नामदेव बोरसे, लालचंद बोरसे, कैलास बोरसे, किशोर बोरसे, दिलीप कोळी, पंकज माळी यांनी बारागाड्या ओढण्यास मदत केली. हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरीक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवात ‘भवानी माता की जय’चा जयघोष करीत गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.

मेहरूण परीसरात भाविकांमध्ये चैतन्य
मेहरूण परिसरात भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त गेल्या दीडशे वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात असतो. यावेळी मान्यवरांच्याहस्ते बारागाड्यांचे पुजन करण्यात आले.  यावर्षी सदोबा वेअर हाऊस ते मेहरूण परिसरातील भवानी माता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या. चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच शहरासह ग्रामीण भागातून नागरिक यात्रा पाहण्यासाठी अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बघा । अंगाचा थरकाप करणारा थरारक व्हिडीओ एकदा पहाच

Add Comment

Protected Content