भावना गवळींची शिवसेनेच्या प्रतोद पदावरून उचलबांगडी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदारांच्या नंतर शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडण्याची चर्चा सुरू असतांनाच पक्षाच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून राज्यात सत्तांतर घडवून आणले. यानंतर आता केंद्रीय राजकारणातील महत्वाचा घटक असणार्‍या खासदारांमध्ये फुटीची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत. माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तर आज शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत येणार असल्याचा दावा केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, पक्षातर्फे सावध पवित्रा घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

या अनुषंगाने, आज भावना गवळी यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी ठाण्यातील पक्षाचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांनी देखील आधीच भाजप सोबत जुळवून घ्यावे अशी मागणी केली होती. पक्षप्रमुखांनी बैठक आयोजीत केली असतांना त्यांनी या बैठकीला दांडी देखील मारली होती. यामुळे त्यांच्याकडी पद काढून घेण्यात आल्याचे मानले जात आहे. संजय राऊत यांनी आज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून भावना गवळी यांना हटविण्याचे पत्र दिले आहे.

Protected Content