जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात बेकरीचा माल देवून पुन्हा जळगावकडे परतत असलेल्या मालवाहू रिक्षाला समोरुन येणार्या आयशरने धडक दिली. या अपघातात दोन जखमी झाल्याची घटना आज बांभोरीजवळ घडली. दोघांना तातडीने 108 जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रविशंकर प्रजापत वय 30 व राजेंद्र किशोर धुप्पड वय 35 दोघे रा. खेडी खुर्द अशी जखमींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, खेडी खुर्द येथील रविशंकर प्रजापत व राजेंद्र धुप्पड जळगाव- भुसावळ रस्त्यावरील लोढा नगरातील प्रेम बेकरीचा माल पोहचविण्यासाठी दोघे बेकरीच्या मालवाहू पॅजो रिक्षाने (एम.एच 19 एस.9034 ) धरणगाव येथे गेले होते. माल दिल्यानंतर बांभोरीजवळ समोरुन धरणगावकडे पाईप घेवून जात असलेल्या आयशरने (एम.एच.04 सी.यु.0617) ने माल रिक्षाला धडक दिली. जोरदार धडकेमुळे रिक्षातील चालक रविशंकर प्रजापत व राजेंद्र धुप्पड हे दोघे रिक्षातून बाहेर फेकले जावून रस्त्यावर पडले.
दोघांना गंभीर दुखापत
या अपघातात रविशंकर तसेच राजेंद्र या दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातादरम्यान एरंडोल येथील 108 रुग्णवाहिका रुग्ण घेवून जिल्हा रुग्णालयातकडे जात होती. चालकाने माणुसकीचे दर्शन घडवित, अपघातातील दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी तातडीने उपचार केले.