नंदूरबार-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या गुजरातमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा समारोप १० मार्चला महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सोनगड येथे होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून यात्रेची सुरवात नंदुरबार येथून करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचा झेंडा सुपूर्द कार्यक्रम नंदुरबार येथे होऊन यात्रा भारत जोडो आदिवासी यात्रा या नावाने नंदुरबार येथून १२ मार्चपासून सुरू होऊन उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने रवाना होणार आहे. नंदुरबार येथे भारत जोडो आदिवासी न्याययात्रेच्या माध्यमातून खासदार गांधी जिल्ह्यातील जनतेला संबोधित करतील. दुपारी एकला यात्रा दोंडाईचाकडे रवाना होईल. दोंडाईचा, धुळे, नाशिकमार्गे यात्रा विविध जिल्ह्यांतून नेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी गांधी घराण्यावर प्रेम केले आहे.
त्याअनुषंगाने काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची सुरू असलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून भारत जोडो आदिवासी न्याययात्रा म्हणून नंदुरबार येथून सुरू होणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांनी दिली. माजी मंत्री तथा आमदार के. सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या गुजरातमध्ये सुरू आहे. १० मार्चला सोनगड येथून यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी १२ मार्चला थेट दिल्लीहून नंदुरबारकडे येतील. दरम्यान, विमानाने सुरत व सुरतेहून वाहनाने नवापूरमार्गे नंदुरबार येथे दुपारी साडेबारापर्यंत येतील.