पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील पुरातन परंपरा असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिराची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी भरणार असून येत्या दि.२९ डिसेंबरपासून या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.
येथील श्री क्षेत्र भैरवनाथ संस्थान हे स्थान तालुक्यातील वरखेडीपासून दिड किलोमीटर अंतरावर बहुळा- खडकाळी संगमावर आहे. यंदा दि.२९ डिसेंबर ते दि.५ जानेवारी आणि दि.१२ ते दि.१९ जानेवारी या चारही रविवारी यात्रा भरणार आहे.
यात्रेची रुपरेषा
श्री क्षेत्र भैरवनाथ महाराजांचे दररोज पहाटे ४ वाजता स्नान, ६ वाजता आरती, दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती, सायंकाळी ५ वाजता देवाला स्नान, ६ वाजता नैवेद्य दिला जातो. पौष महिन्यात भाविकांसाठी रोज रात्री पुरान, भागवत कथा, रामकथा, हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. शेवटचा रविवारनंतर सोमवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते.
सौंदर्यात पडली भर
यापार्श्वभूमीवर तिर्थ क्षेत्र विकास योजनेतून १ कोटी ७६ लाखांची विकास कामे केली जात आहेत. सावखेडा येथील भैरवनाथ मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. यात संरक्षण भिंत, सभागृह व भाविकांसाठी ४ खोल्या, रस्त्यांचे काँक्रिटीकरण यामुळे सुशोभिकरणात भर पडली आहे.