भडगाव-धनराज पाटील | वाळू वाहतूक करणारे भरधाव ट्रॅक्टर वस्तीमध्ये शिरल्याने एका चिमुकलीचा बळी गेल्याची भयंकर घटना तालुक्यातील आमडदे येथे घडल्याने परिसर हादरला आहे.
या संदर्भातील प्राथमिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील आमडदे येथे आज पहाटे एक भयंकर घटना घडली. परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असते. अशाच प्रकारे वाळूची चोरटी वाहतूक करणारे भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर हे आमडदे येथील गणपती नगरातल्या वस्तीमध्ये शिरले. या जोरदार धडकेमुळे एक बालिका ठार झाली असून तीन-चार घरे उध्वस्त झाली आहेत.
या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज झाला. तसेच यात जखमी झालेल्यांनी किंकाळ्या फोडल्या. यामुळे परिसरातून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. या भागात कच्चे बांधकाम केलेले घरे असल्याने ट्रॅक्टरच्या धडकेत ते कोसळून यातील लोक जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. या भयंकर प्रकारात एका चिमुकलीचा बळी गेला असून किमान सहा जण जखमी झाले आहेत अशी माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीला आमडदेकरांनी दिली आहे. दरम्यान, सदर ट्रॅक्टर हे वाळू वाहतूक करणारे असले तरी दुर्घटना घडली तेव्हा त्यात वाळू नव्हती असेही समजते.
दरम्यान, या भयंकर घटनेमुळे परिसरातील वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून आमडदेकरांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आमडदे येथी दुर्घटना झालेल्या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती संभाजी भोसले यांनी केली आहे.
( ही बातमी आम्ही लवकरच अपडेट करत आहोत. )