सावधान ! वाढताहेत व्हॉट्सॲप हॅकिगचे प्रकार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सायबर फसवणूक करणाऱ्यांनी व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करण्यासाठी नवीन आणि अत्याधुनिक पद्धती शोधल्या आहेत. हे हॅकर्स सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक चॅट्स आणि संपर्क यादीत प्रवेश मिळवून, विश्वास संपादन करून फसवणूक करत आहेत. हॅक केलेल्या अकाउंटचा गैरवापर करून स्कॅमर तातडीने पैशांची मागणी करतात, विशेषतः वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर अडचणीच्या कारणांची बतावणी करत. या प्रकारामुळे पैसे पाठवणारे आणि ज्यांच्या फोनवरून संदेश गेला आहे ते वापरकर्ते, दोघेही फसवले जातात.

हॅकर्स पीडिताच्या नंबरवर सहा-अंकी व्हॉट्सॲप पडताळणी कोड पाठवतात. पीडिताने तो शेअर केल्यास हॅकरला खात्याचा पूर्ण प्रवेश मिळतो. फसवणूक करणारे कुरिअर सेवा प्रतिनिधी म्हणून स्वतःला सादर करतात आणि पीडितांना २१ ने सुरू होणारा विशिष्ट नंबर डायल करण्यास सांगतात. यामुळे कॉल फॉरवर्डिंग सक्रिय होते आणि पीडिताचा डेटा हॅकरकडे पोहोचतो. तोतयागिरी घोटाळा: हॅकर्स स्वतःला मित्र म्हणून सादर करून ओटीपीची विनंती करतात. पीडित व्यस्त असल्याने खातरजमा न करता ओटीपी शेअर करतो, ज्यामुळे हॅकरला अकाउंटवर नियंत्रण मिळते.

पत्रकाराचा अनुभव: मुंबईतील एका पत्रकाराने ‘मीड डे’ला सांगितले की, ब्लू डार्टचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने त्यांना विशिष्ट नंबर डायल करण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कांना 42,000 रुपयांची मागणी करणारे बनावट संदेश पाठवण्यात आले. चित्रपट क्युरेटरचे संकट: मीनाक्षी शेड्डे हिने मित्राकडून आलेल्या ओटीपीच्या विनंतीवर विश्वास ठेवून अकाउंट गमावले. अमेरिकेत पोहोचल्यानंतर तिला कळले की तिचे व्हॉट्सॲप हॅक झाले आहे. खातं परत मिळवण्यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला.

सावधगिरीचे उपाय:

कोणताही ओटीपी किंवा पडताळणी कोड इतर कोणाशीही शेअर करू नका.
21 ने सुरू होणारे कोणतेही नंबर डायल करण्यापूर्वी खात्री करा.
दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two-Step Verification) सक्रिय ठेवा.
अनोळखी कॉल्स किंवा संदेशांकडे विशेष सावधगिरी बाळगा.