जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याच्या काही भागांत बेमोसमी पावसाने हजेरीसह तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.
जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने गेल्या सप्ताहातच राज्यातील काही जिल्ह्यात बेमोसमी पावसाचे संकेत दिले होते. जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा दिसून आला, तर दुपारी तप्त उन्हाची अनुभूती जिल्हावासीयांना आली. सायंकाळी प्रचंड उष्मा जाणवून रात्री 11वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने हजेरी लावली.
रब्बी पिकांच्या नुकसानीची शक्यता
जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर 2021च्या अतिपावसामुळे खरीप हंगामात बरेच नुकसान झाले आहे, तर रब्बी हंगाम बरा होईल या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, गहू, हरबरा आदी वाणांची लागवड केली आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील वाणांची लागवडीचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी गहू, हरबरा पीक कापणी होऊन काढणी देखील सुरू आहे, परंतु या बेमोसमी पावसामुळे कापणी व काढणीस आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.