मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडक्या बहिणींना अपेक्षित असलेली आर्थिक मदत न जाहीर केल्याने महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात हप्ता वाढ होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सन्माननिधी वाढीबाबत कोणतीही घोषणा न केल्याने महिलांची निराशा झाली आहे. त्यामुळे आता किमान वर्षभर तरी महिलांना वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आज सादर झालेल्या 7 लाख 20 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 या वर्षासाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या तरतुदीत हप्ता वाढवण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना 2100 रुपये मिळण्याच्या आशेवर पाणी फिरले आहे.
महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या आर्थिक मदतीसाठी महिलांमध्ये मोठी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात गेल्या वर्षी प्रमाणेच योजनेसाठी निधी जाहीर झाल्याने महिलांना 1500 रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत या योजनेसाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षातही योजनेसाठी 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. तसेच काही महिला गटांनी या योजनेतून मिळालेल्या निधीचा उपयोग आर्थिक उपक्रमांसाठी बीज भांडवल म्हणून केला आहे. त्यामुळे अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याचा विचार सरकार करत आहे. मात्र, यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सरकार पुढील वर्षी 2100 रुपये हप्ता जाहीर करणार का, याकडे आता महिलांचे लक्ष लागले आहे.