व्यवसायातील संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना – ना. पाटील (व्हिडीओ)

sonavane college

भुसावळ, प्रतिनिधी | उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या व्यवसायातील संधींचा लाभ घेत नोकऱ्या देणारे बना, असे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील महर्षी व्यास माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात काल (दि.१९) केले.

 

याप्रसंगी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, आदी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन संतोष सोनवणे, मुख्याध्यापिका यामिनी सोनवणे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र संघटक निलेश सुरळकर, सरपंच सीमा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एस.डी. सोनवणे ज्युनियर कॉलेजच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले.

ना.पाटीलपुढे म्हणाले की, ‘उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे, ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल, अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करावा लागतो, अशी अगतिकता असू नये तर नोकरीतल्या संधी भलेही सोडेन पण स्वत: रोजगार निर्माता बनेन, स्वत:चा व्यवसाय सुरू करेन अशी भावना त्यामागे हवी.

‘शिक्षणव्यवस्था सक्षम करण्याकरता ‘शिक्षक’ हा घटकच सर्वात महत्त्वाचा आहे. मातीच्या ओल्या गोळ्याला घडवण्याचं काम शिक्षक करतात. त्यामुळे दर्जेदार शिक्षण देणे आणि पिढ्या घडवण्याची जबाबदारी मुख्यतः शिक्षकांवरच असते, अशा भावना नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदी जनता शिक्षण प्रसारक मंडळ व महर्षी व्यास माध्यमिक विद्यालयाचे संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content