
जळगाव (प्रतिनिधी) बेटी बचाव, बेटी पढाव हा शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. गेल्या काही वर्षांमधील सोनोग्राफी सेंटरची तपासणी, गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर झालेल्या कायदेशीर कारवाया, नागरीक आणि संबंधित यंत्रणा यांच्यातील समन्वयाने जिल्ह्यात मुलींचा जन्मदर बऱ्यापैकी वाढला आहे. यामध्ये यापुढेही सातत्य ठेवून सोनोग्राफी सेंटरची अचानकपणे तपासणी करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गडीलकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात श्री. गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बेटी बचाओ बेटी, पढाओ कृतीदलाची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण योगेश पाटील, महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास अधिकारी तडवी, सामान्य रुग्णालय, जिल्हा आरोग्य कार्यालय जि.प, महानगर पालिका आरोग्य विभाग, महिला बाल विकास, समाजकल्याण विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असला तरी काही तालुक्यात जन्मदरात अपेक्षित वाढ नसल्याने या मोहिमेत गावपातळीपर्यंच्या सर्व घटकांना सामावून घ्यावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी. शाळाबाह्य मुलींचे गांव, तांड्यापर्यंत सर्वेक्षण होवून एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी समन्वय ठेवून विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधितांना दिल्यात. या कामात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना जाहिर कार्यक्रमात प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या सूचनाही शेवटी श्री.गाडीलकर यांनी दिल्यात.