नवी दिल्ली वृत्तसंस्था । टीम इंडियामध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असणारा माजी कर्णधार राहुल द्रविडला हितसंबंधांच्या मुद्यावरुन बीसीसीआयने नोटीस बजावली होती. या प्रकरणी अखेर द्रविडला बीसीसीआयचे अधिकारी न्यायमूर्ती (निवृत्त) डी. के. जैन यांनी नुकतीच क्लीन चिट देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
न्यायमूर्ती जैन यांच्यानुसार, त्यांना माजी भारतीय कर्णधाराविरोधातील आरोपांमध्ये कुठलंही तथ्य आढळले नाही. द्रविडची 12 नोव्हेंबरला जैन यांच्यासमोर हजेरी होती. त्यानंतर जैन यांनी हा निर्णय सुनावला. द्रविडवर एकाच वेळा दोन जबाबदाऱ्या पार पडत असल्याचा आरोप करण्यात आला होता. बीसीसीआय संविधान नियम 38 (4)नुसार कोणतीही व्यक्ती एकाच वेळा दोन पद घेऊ शकत नाही. द्रविडवर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप केला होता. त्यानंतर द्रविडवर बीसीसीआच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुनावणी झाली होती. मात्र आता द्रविडची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.