बीसीसीआय निवड समितीत खलबतं सुरु…

bcci

 

मुंबई वृत्तसंस्था । बीसीसीआयची निवड समिती एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. प्रसाद आणि पूर्व विभागाचे प्रतिनिधी गगन खोडा यांचा ४ वर्षांचा कार्यकाळ उद्या संपणार असून निवड समितीच्या अध्यक्षपदाची सुत्र कोणाला द्यायची, यावरून समितीत सध्या गोंधळ सुरु आहे. त्यामुळे अखेरीस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्याकडे निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र जाऊ शकतात. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत याविषयी अंतिम निर्णय होणार आहे. सध्या बीसीसीआयमध्ये निवड समितीवरुन खलबतं सुरु आहेत. काही अधिकाऱ्यांच्या मते सध्या असलेली निवड समिती पूर्णपणे बरखास्त करत नवीन निवड समिती नेमण्यात यावी. मात्र प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्युनिअर संघाच्या निवड समितीचे सदस्य ग्यानेंद्र यांना शिवरामकृष्णन यांच्या समितीत स्थान मिळण्याची शक्यता आहे. जतीन परांजपे, देवांग गांधी आणि शरणदीप सिंह यांचा निवड समितीतला कार्यकाळ अजून शिल्लक आहे.

मध्यंतरी प्रसाद यांच्या निवड समितीला टीकेचे धनी व्हावे लागले होते. २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, शर्यतीत असलेल्या खेळाडूंना गाळणं तसंच चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी एकही योग्य पर्याय न शोधणं यामुळे निवड समितीला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. मध्यंतरी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी रस दाखवला होता. मात्र बीसीसीआयला या पदासाठी सध्याच्या क्रिकेटपटूंशी जुळवून घेऊन नवीन कल्पनांवर काम करेल असा उमेदवार हवा आहे. त्यामुळे वेंगसरकरांचं नाव मागे पडण्याची चिन्ह आहेत. याचसोबत भारताचा माजी यष्टीरक्षक विजय दाहीयाही या पदासाठी शर्यतीत असल्याचं समजतंय. त्यामुळे अखेरीस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Protected Content