अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्रकारांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध म्हणून येथे पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अंत्ययात्रा काढली.
पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत बावनकुळे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांच्या संदर्भात बदनामी व अवमानकारक बेताल असे वक्तव्य केले. चांगल्या बातम्या छापून आणायच्या असतील तर पत्रकारांना चहा पाणी पाजा, त्यांना ढाब्यावर न्या हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारितेला बदनाम करणारे असून त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मीडिया अमळनेरच्या वतीने तीव्र निषेध करत अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालया पर्यंत बावनकुळे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना निवेदन देण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे वक्तव्य पत्रकारांवरील शाब्दिक हल्ला असल्याने पत्रकारांवरील हल्ले या कायद्या अंतर्गत त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून असे वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.
यावेळी निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष जयंतलाल वानखेडे, वाईस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष अजय भामरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस रवींद्र मोरे ,कार्याध्यक्ष समाधान मैराळे, हिरालाल पाटील ,धनंजय सोनार ,सुरेश कांबळे ,जितेंद्र पाटील, उमेश धनराळे, विनोद कदम, राहुल पाटील, ईश्वर महाजन ,गुरुनामल बठेजा, मिलिंद पाटील , सत्तार पठाण,हितेंद्र बडगुजर, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे ,दिनेश पालवे आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.