रोहिणी खडसे यांनी वर्धा येथील सेवाश्रमात केले बापूजींना वंदन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज वर्धा येथील सेवाश्रमात महात्मा गांधीजी यांना वंदन केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ . सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी विदर्भ दौर्‍यावर असताना वर्धा येथे महात्मा गांधींजी यांनी निवास केलेल्या सेवाग्राम आश्रमास आणि आचार्य विनोबा भावे यांनी निवास केलेल्या पवनार येथील परमधाम आश्रमास भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांना अभिवादन केले.

सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांचे निवास असलेले बापू कुटी, कस्तुरबा गांधी यांचे निवास असलेली बा कुटी , गांधीजींचे कार्यालय असलेले बापू दप्तर, आणि आखरी निवास, आदीनिवास,प्रार्थना भूमी ची त्यांनी पाहणी केली तसेच त्यासोबतच ग्रामोद्योग, सूतकताई, रंगाई, विनाई , पुस्तकालय, खादी उत्पादन तसेच शेती व गोशाळेस भेट देऊन माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी सुप्रिया ताई सुळे, रोहिणी ताई खडसे यांनी चरख्यावर सुतकताई केली ,यावेळी आश्रमाच्या वतीने सुताची माळ घालून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या महात्मा गांधीजींनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली. खरा भारत गावागावात, खेड्यापाड्यात वसला आहे, हे जाणून ’खेड्याकडे चला’ अशी हाक देऊन. वर्ध्या जवळ ’ सेगाव’ हे गांधीजींनी आपल्या वास्तव्यासाठी निवडले. सेगाव कालांतराने ’सेवाग्राम’ म्हणजेच सेवेचे गाव झाले. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींजी यांची साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वावरील जीवनशैलीचे दर्शन घडते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण मानवजातीसाठी दिलेला सत्य, अहिंसा आणि प्रेम हा संदेश सर्वांना कायम प्रेरणा देणारा आहे,स्वतःचे संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केलेले, जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे सर्वधर्म समभाव, विश्वबंधुता, ग्रामस्वराज्य, ग्रामोद्योग, पर्यावरण या बहुविध विषयांवरील विचार आजच्या काळातही समर्पक आणि मार्गदर्शक आहेत. भविष्यात सुध्दा त्यांच्या विचारांवर पिढ्यानपिढ्या मार्गक्रमण करत राहतील. सेवाग्राम येथे भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळाली तसेच पवनार येथील येथील धाम नदी तीरावर स्थित ब्रह्मविद्या मंदिर (परमधाम आश्रम) म्हणजे ’जय जगत’चा नारा देणार्‍या आणि भूदान चळवळ राबवून दान मिळालेली लाखो एकर जमीन भूमीहिनांना देणार्‍या आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी होय. येथे त्यांनी जगण्याचे विविध प्रयोग केले. संतांची ही कर्म व प्रेरणाभूमी आहे.

आचार्य विनोबा भावे यांनी गीताई, भूदान चळवळ, सर्वोदय चळवळ, महात्मा गांधी तत्त्वदर्शन, वेद-उपनिषदांचे व्यासंगी चिंतन, सामूहिक साधना, जगण्याचे विविध प्रयोग, वैज्ञानिक भूमिकेतून भारतीय तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्यांची वृत्ती आध्यात्मिक आणि दृष्टी वैज्ञानिक होती. म्हणूनच ते आधुनिक ऋषी म्हणून उदयास आलेले एक तपस्वी व्यक्तिमत्त्व होय विनोबांनी दिलेली शिकवण व स्वावलंबन याचे आजही या आश्रमात कटाक्षाने पालन केले जाते येथे येऊन मनाला एक वेगळी प्रसन्नता आणि उर्जा लाभली
सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणार्‍या या दोन्ही महान विभूतींचे आचार विचार कायम प्रेरणादायी आहेत असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

यावेळी माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशध्यक्ष मेहबूब भाई शेख,पवनार आश्रमाचे गौतम बजाज, उषा दिदी,समीर देशमुख, किशोर माथनकर, सुनील राऊत, अतुल वंदिले, नितीन देशमुख, संदीप भांडवलकर, प्रशांत भोयर,सूरज वैद्य ,आश्रमाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content