बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाडच्या निषेध आंदोलनाची नसती उठाठेव बंद करावी – अँड मनोहर खैरनार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल-परवापासून महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत करण्याचा डाव रचला आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या अवमानापेक्षा आव्हाड यांचे कडून होत असलेले मनुस्मृतीचे जाहीर दहन असह्य झाल्याने त्यांनी आंदोलनाचा कांगावा त्यांनी करू नये,अन्यथा राज्यभरात होणाऱ्या सार्वजनिक मालमत्तेची दंडात्मक नुकसान भरपाई चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शासनाने वसूल करावी अशी मागणी करणारे निवेदन आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अँड. मनोहर खैरनार यांनी तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन देवून केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की २९ मे रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतिचे जाहीर दहन करणे हे आर.एस.एस.च्या धुरिणांना असह्य होणारच होते. मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेशाचा मनसुबा यशस्वी करण्यासाठी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्या साठी काहीतरी कोलीत हाती असावे म्हणून शुद्र/ओ.बी.सी.तील मोहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पध्दतशीर वापर भाजपाने केला आहे.

मनुस्मृति व भगवत गीतेतील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी राजशक्तीचा दुरुपयोग आरएसएस व भाजपा सरकारने नेटाने सुरू केला आहे. याचा निषेध म्हणून आ. जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळ्या चे परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनुस्मृती दहन कार्यक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे जाहीर केल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या मनात आव्हाड यांना अडचणीत आणण्याचा डाव होताच.त्यात आव्हाड यांच्या हातून पाठ कोऱ्या बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अनावधानाने फाडला जाण्याच्या कृतीचे नाहक भांडवल करून भाजपा व आरएसएसने बावनकुळे यांना गजब माजविण्याचा ठेका दिल्याचे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तहयात छळणाऱ्या तसेच बाबासाहेबांच्या जात बांधवांना अस्पृश्य ठरवून जनावरापेक्षाही हलक्या प्रतीचे गावकुसाबाहेर चे जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या सनातन्यांना आत्ता बाबासाहेबांच्या तथाकथित अवमान कृत्याचा इतका राग येण्याची गरज काय ? याच भीमरावाला तुमच्या शाळेच्या वर्गात बसण्यास परवानगी नदेणाराचा हा राजकारणी कळवळा का ! पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य नेत्याच्या आज अवमानाच्या निषेध आंदोलना साठी बावनकुळ्यांनी सरसंघ चालक श्रीमंत पंत मोहन भागवत यांची परवानगी घेतली आहे का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाल्यास बाबासाहेबां ची लेकरं योग्य तो न्याय मिळवून घेण्यासाठी व प्रसंगी रस्त्यावर उतरून हक्कासाठी भांडण्याचा बाणा अंगी बाळगत असताना व एक एक ५६ ला भारी पडत असताना ५२ कुळ्यां च्या अशा राजकीय बेगडी प्रेमाची व मदतीची आवश्यकता बाबासाहेबांच्या अनुयायांना व लेकरांना नक्कीच नाही.म्हणून बावनकुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमान आंदोलनाच्या नावाखाली राजकीय भांडवल करुन राज्यातील जनजीवन विस्कळीत करण्याची व कायदा व सुव्यवस्था बिघडवून सार्वजनिक शांतता नष्ट करण्याची गरज नाही.

आपल्या राज्यात अनाधिकृत पणे चालणाऱ्या कसिनो, पब, मटका, ५२ पानी जुगार, ड्रग्स, गावरान हातभट्टी, देशी-विदेशी या आपल्या पारंपारिक सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे बावनकुळे नी लक्ष केंद्रित करून आपल्या पक्षाकडे असलेल्या गृह विभागाचा योग्य वापर करावा. तसेच आरक्षण रद्द करण्यासाठी सुरू केलेला खासगीकरणाचा खेळ थांबवून लाखो बेरोजगार तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळवून द्याव्या जेणेकरून त्यांची लग्न तरी होतील.कृषी साहित्य व बियाण्यांवरील जीएसटी बंद करण्यासाठी आंदोलन करावे. असे एकना अनेक प्रश्न राज्या समोर असताना, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाचे कारण करत कायदा व सुव्यवस्था बिघडून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाल्यास, झालेल्या नुकसानाची बावनकुळे यांच्याकडू वैयक्तिक दंडात्मक वसुली करावी अशी मागणी आज दिनांक ३१ मे २०२४ रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्र्यांसह म. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मुक्ताईनगर यांना निवेदन देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एड. मनोहर खैरनार व कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.या वेळी मिलिंद झाल्टे,राहुल झाल्टे,लक्ष्मण भालेराव, रवींद्र पोहेकर, कांतीलाल वानखेडे, मिलिंद भालेराव, सुखदेव सावळे, जितेंद्र बोदडे, प्रमोद भालेराव इत्यादी कार्यकर्ते हजर होते.

Protected Content