भुसावळ प्रतिनिधी । मेहतर वाल्मीकी व सुदर्शन समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन संतोष बारसे आणि नगरसेविका सोनी बारसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले.
मेहतर वाल्मिकी व सुदर्शन समाजाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवारी शहरातील टी.व्ही.टॉवर मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारण्यांमुळे हा कार्यक्रम न झाल्यामुळे नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी मेहतर वाल्मिकी समाजाच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर निवेदन दिले. यामध्ये विविध मागण्यात करण्यात आल्या आहेत. यात वाल्मिकी मेहतर समाज हा उपेक्षित घटक असून समाजाच्या प्रतिनिधीला सत्तेत सहभागी करून घ्यावे, सफाई कर्मचार्यांची रिक्त पदे भरावीत, वारसा नोकरी देताना शैक्षणिक पात्रता पाहून पदे द्यावीत, गटारी, ड्रेनेज स्वच्छता करताना मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, स्वच्छतेशी निगडीत समाज दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत असल्याने या समाजाच्या पाल्यांना शिक्षणहक्क कायद्याच्या माध्यमातून दहा टक्के सरळ प्रवेश देवून शिक्षणाची व्यवस्था करावी. इयत्ता अकरावी ते उच्चशिक्षणात अनुदानित खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के जागांवर समाजातून प्रवेश, राज्यातील मेहतर समाजातील बेघर कुटूंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पुरेसे आर्थिक ऋण उपलब्ध करुन द्यावे, औद्योगिक क्षेत्रात लघु उद्योग, दीर्घ व कुटीर उद्योगासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच एकर जागा स्वतंत्र हक्काने देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन मुख्यमंत्र्यांना देतांना माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.