डांभुर्णी गावाजवळ खळयाला आग : गुरांचा चारा जळून खाक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी गावाच्या-डोणगाव मार्गवरील खळ्याला लागलेल्या आगीत हजारो रूपयांचा चारा खाक झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळच्या दोणगाव मार्गावरील लाला कुका भरवाड व रमेश कुका भरवाड ( काठयावाडी ) हे दोघ भाऊ गाई म्हशीच्या दुधापासून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत असतात. पावसाळ्यात गुरांना जंगलात चारा उपलब्ध होत नसल्याने व शेतकर्‍यांच्या शेतात असलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पशुधन पालक यांनी आपल्या गुरांसाठी लागणार्‍या चार्‍याची साठवणूक ठेवली होती.

मात्र काल दिनांक १३ मे सोमवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रमेश भरवाड याने दादरचा कडबा ट्रॅक्टर मध्ये भरून आणला असता विद्युत प्रवाह सुरु असलेल्या वायरी कडब्यात अटकून तुटल्याने त्या वायरी या ठिकाणी साठवणुक करून ठेवलेल्या चार्‍याच्या ढिगावर पडताच स्पार्कींग होऊन आग लागली.

या आगीत हजारो रुपयांचा चारा जाळून खाक झाला. यात हरभरा खार, दादर कुट्टी, मका कुट्टी, मका तरफल,असा मिश्रीत चार्‍याचा ढीग पेटल्याने आगीचे लोळे हवेत उडत होते. गावर्‍यांनी तात्काळ आग विझवण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले. तर यावल येथून अग्निशमक गाडी बोलून पाणी फवारणी करीत चालक शिवाजी पवार व फायरमन शाहरुख खाटीक यांनी आग आटोक्यात आणली. या ठिकाणी आग विझावतांना इतर जीवितहानी झाली नाही व गावकर्‍यांच्या मदतीने व सतर्कता राखल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, चारा पेटल्याची माहिती मिळताचा माजी विकासो चेअरमन रामचंद्र चौधरी यांनी घटनास्थळी भेटू देत अग्नीशामक दलातील गाडीचे पाणी संपताच गाडी आपल्या खळ्यात बोलून पम्प सुरु करीत गाडी भरून दिली व पुन्हा जोमाने पाणी फावरून आग पूर्णपणे विझवण्यात रामचंद्र चौधरीनी निस्वार्थी सहकार्य केले. या ठिकाणी पशुधन धारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने काही दखल घ्यावी अशी अपेक्षा पशुधन धारकांकडून व्यक्त केली गेली. तसेच आगीमुळे तुटलेली वायर व वीज पुरवठा सावधपूर्वक करण्यात यावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content