जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक क्रेनने मागून जोरदार धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली येवून महिला चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
रंजना उत्तम येसे (वय-५३) रा. म्हाडा कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
जळगाव शहरातील म्हाडा कॉलनी येथे रंजना येसे या महिला मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मुलगा विकास हा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पायी जात होत्या. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मागून येणारा क्रेन क्रमांक (एमएच ४० पी २३०९) ने जोरदार धडक दिली. क्रेनने धडक दिल्यानंतर त्या जमीनवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेतली होती. तर क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.