भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीत बनावटी नोटा आढळून आल्याच्या प्रकार मंगळवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नाशिक येथील तीन जणांवर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ ते दिपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ मंगळवारी १७ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता भीषण अपघात झाला होता. या अपघातात हिरामण कारभारी धात्रक वय ४६ रा. नाशिक याचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले नरेंद्र दत्ता मुळे वय ५४ आणि विजय देवराम काळे वय ३२ दोन्ही राहणार नाशिक हे जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी भुसावळ तालुका पोलीसांनी भेट देवून चौकशी केली होती. त्यावेळी नरेंद्र मुळे आणि विजय काळे यांच्याकडे ५६ हजार २०० रूपये किंमतीच्या बनावटी नोटा आढळून आल्या होता. यावेळी त्यांची चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलीसांनी बनावटी नोटा, ८ मोबाईल, इतर रोकड जप्त केला आहे. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत हिरामण कारभारी धात्रक वय ४६, जखमी नरेंद्र दत्ता मुळे वय ५४ आणि विजय देवराम काळे वय ३२ सर्व राहणार नाशिक यांच्या विरोधात गुरूवारी १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे हे करीत आहे.