बापरे.. लग्न समारंभातून नववधूचे साडेचार लाखांचे दागिने लांबविले ।

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील सुरभी लॉन येथे एका लग्न समारंभातून नववधूचे सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सतीश गुलाबराव जाधव वय-५२,रा. कोल्हे नगर जळगाव यांच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन एमआयडीसीतील सुरभी लॉन येथे रविवार १४ जुलै रोजी करण्यात आले होते. या अनुषंगाने नववधूचे सर्व दागिने, रोकड आणि मोबाईल एका पिशवीत ठेवून सतीश जाधव यांच्या पत्नीकडे संभाळण्यासाठी दिले होते. त्यांनी ते दागिने हॅण्डबॅगमध्ये ठेवलेले होते. दरम्यान दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लग्न समारंभ कार्यक्रम सुरू असताना सतीश जाधव यांच्या पत्नी या काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांच्या हातातील दागदागिन्यांची हॅन्डबॅग हॉलच्या एका कोपऱ्यात ठेवली होती, त्यांचे काम आटोपून त्या परत बॅगेकडे आले असता, त्यांना दागिन्यांची बॅग दिसून आली नाही. लग्न समारंभात संपूर्ण शोधाशोध करत नातेवाईकांनी विचारपूस करण्यात आली. परंतु दागिन्यांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही अखेर सतीश जाधव यांनी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे करीत आहे.

Protected Content