


चोपडा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात आज सकाळी सात वाजेपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला दणक्यात सुरुवात झाली आहे. शहरातील ६५ गणेश मंडळांनी आपापल्या लाडक्या गणरायाला आकर्षक वाहनांवर विराजमान करून मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात लाडक्या बाप्पाला भावूक अंतःकरणाने निरोप देण्यासाठी बालकांपासून वृद्धांपर्यंत असंख्य नागरिक आणि भाविक रस्ते व चौकाचौकांत सज्ज झाले आहेत.
विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोपड्यात कडेकोट आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक यांच्या थेट नेतृत्वाखाली चोपडा, पाचोरा आणि सीआयडीचे ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे ३३ अधिकारी या संपूर्ण बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय नाशिक एमपीएचे ८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक देखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांचे २९२ पुरुष व ३१ महिला पोलीस अंमलदार, हायवे ट्रॅफिकचे २८ आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस विभागाचे ९ अंमलदार प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ३ आरसीपी प्लाटून, ३ स्ट्रायकिंग फोर्स आणि २ एसआरपीएफ प्लाटून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच संपूर्ण विसर्जन मिरवणूक मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने ७० पेक्षा जास्त उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलीस प्रशासनाकडून चोवीस तास बारीक लक्ष ठेवले जात आहे.



