अकोला (वृत्तसंस्था) अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे प्रतिबंधित एचडी बीटी कापूस व वांगे लागवडीचा कार्यक्रम शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी (दि. २४ जून) घेण्यात आला होता. या कार्यक्रमाची जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी बुधवारी १२ शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ‘द वायर’ने वृत्त दिले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने २०१५ पासून बीटी कापसावर बंदी घातली आहे. बीटी वांग्याची लागवड २०१० पासून त्यावेळचे पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी बंदी घातल्यापासून प्रतिबंधित आहे. तर शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे, की जनुकीयदृष्ट्या सुधारित पिकांना परवानगी दिली गेली पाहिजे कारण ती शेतकऱ्यांकरिता अधिक फायदेशीर असतात. तसेच भारतातील पर्यावरण-अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैवतंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. वारंवार विनंत्या करूनही सरकारने या मार्गातील अडथळे दूर केले नाही. त्यामुळे जैवतंत्रज्ञानाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावेत, या शेतकऱ्यांच्या आग्रहाला पाठिंबा देत शेतकरी संघटनेने अकोली जहागीर येथील प्रतिबंधित एचटीबीटी कापूस व वांगे लागवडीचा कार्यक्रम हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेतला होता.
या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रतिबंधित पेरण्यात आलेल्या बियाण्यांचे नमुने घेत ते नागपूर प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संदर्भात शेतकरी संघटनेवर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली होती. अखेर बुधवारी कृषि विभाग तक्रारीनंतर प्रयोग पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.